ठाण्यात वृक्षछाटणीमुळे पक्ष्यांवर कुऱ्हाड – ७० पक्षी जीवानिशीघोडबंदर रोडवरील ऋतु एन्क्लेव्ह सोसायटीत खासगी ठेकेदाराचा प्रमाद
ठाणे: ठाण्यात वृक्षांच्या फांद्या छाटल्यामुळे घरट्यांमधील सुमारे ७० पक्ष्यांच्या जीवावर बेतल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. घोडबंदर रोडवरील आनंद नगर येथील ऋतु एन्क्लेव्ह सोसायटीत खासगी ठेकेदाराने केलेल्या अवैध वृक्ष छाटणीमुळे अनेक पक्षी जीवानिशी गेल्याने ठाणे महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. ऋतु एन्क्लेव्ह सोसायटीने या गंभीर प्रकाराचा तातडीने खुलासा करावा, असे पालिकेने बजावले असुन पक्ष्यांना मारल्याप्रकरणी ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पालिकेने पत्राद्वारे कासारवडवली पोलिसांना दिले आहेत. घोडबंदर रोडवरील आनंद नगर येथे रुतु एन्क्लेव्ह सोसायटी आहे. या सोसायटीच्या आवारातील वृक्ष छाटणी करताना तब्बल ७० पक्षांचा बळी गेला असुन २८ पक्षी जखमी झाले आहेत. सोसायटीच्या आवारातील झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटण्यासाठी ऋतू एन्क्लेव्ह सोसायटी यांच्यावतीने ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे रीतसर अर्ज केला होता. त्यानंतर वृक्ष प्राधिकरण विभागाने संबंधित सोसायटीला वृक्ष छाटणीची परवानगी दिल्याने वृक्ष छाटणीसाठी सोसायटीने कंत्राटदाराची नियुक्ती केली. त्यानुसार ठेकेदाराने गुलमोहराचे एक झाड आणि अन्य एका जातीच्या झाडांवर कुर्हाड चालवली. या झाडांवर पक्षांची अनेक घरटी होती. या घरट्यामध्ये पक्षांची अंडी व पिल्लेही होती. फांद्या छाटताना घरट्यांमधील ७० हुन अधिक पक्षांचा मृत्यू झाला. तर जखमी २८ पक्ष्यांवर खाजगी पशुवैद्यकिय दवाखान्यात उपचार सुरू आहेत. हा सर्व प्रकारानंतर पक्षीप्रेमींकडून तक्रार दाखल करण्यात आल्याने पालिकेकडून पाहणी करण्यात आली. त्यानंतर पालिकेच्या उद्यान विभागाने संबंधित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना या प्रकाराबद्दल तीन दिवसात खुलासा करण्याचे बजावले. तर वृक्ष छाटणी करणारे कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी कासारवडवली पोलीस ठाण्यालाही पत्र दिले आहे. चौकट – वृक्षछाटणीच नियमबाह्य ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने सोसायटीला नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये वृक्ष छाटणी करताना ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे आणि अटी प्रमाणे वृक्ष छाटणी झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नियमाप्रमाणे वृक्ष छाटणी करताना त्या वृक्षावर पक्षाचे घटी नसावी तसेच वृक्ष पर्णहीन होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र सोसायटीने नेमलेल्या कंत्राटदाराने यासंदर्भात कोणतीच काळजी न घेतल्याने हा सर्व प्रकार घडला आहे.चौकट – पक्ष्यांच्या विष्ठेमुळे रहिवाश्यांना आजार ऋतु एन्क्लेव्ह सोसायटीच्या आवारातील या झाडांच्या छाटणीत पक्ष्यांचा बळी जाणे हे चुकीचे आहेच परंतु याची दुसरी बाजु देखील आहे. या वृक्षांवर मोठया प्रमाणात पक्ष्यांचा अधिवास असुन त्यांच्या विष्ठेमुळे रहिवाश्यांना दम्याचे तसेच श्वसनाचे आजार जडतात. या पक्ष्यांना टाकले जाणाऱ्या खाद्यामुळेही परिसरात दुर्गधी पसरते. – डॉ. विवेक वडके, स्थानिक रहिवाशी